आमच्या विषयी
महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ मर्यादित ही महाराष्ट्रातील जिल्हा गृहनिर्माण सहकारी महासंघांची सर्वोच्च संस्था आहे. राज्यात एक लाख पंचवीस हजार हून अधिक गृहनिर्माण संस्थांचे जाळे आहे आणि त्यांचे तीन कोटीहून अधिक सदस्य आहेत. महासंघाचे उद्दिष्ट सहकारी तत्त्वांचा प्रसार करण्याबरोबरच गृहनिर्माण संस्थांचे सभासद आणि पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र सहकार संस्था कायदा, १९६०, नियम, उपविधी, सहकार विभागाचे आदेश आणि परिपत्रके ह्याबद्दल माहिती देऊन त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना त्यांच्या अधिकाराची माहिती देणे असे आहे.
सहकारी संस्थांमध्ये, सुसंवादी जीवन जगण्यासाठी ज्ञान ही गुरुकिल्ली आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे. हे साध्य करण्यासाठी आम्ही नियमित चर्चासत्रे आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित करतो; ज्यात सहकारी निवडणुकांसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिका-यांसाठी विशेष कार्यक्रमांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, आम्ही गृहनिर्माण संस्था व्यवस्थापकांसाठी एक पदविका अभ्यासक्रम चालवतो. ह्या अभ्यासक्रमात त्यांना कार्यक्षम व्यवस्थापनासाठी आवश्यक कौशल्ये शिकवली जातात.
महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघातर्फे आम्ही मध्यस्थ म्हणूनही परिणामकारक भूमिका बजावतो. संस्थेचे सभासद आणि पदाधिकारी, विशेषत: व्यवस्थापकीय समितीबरोबरचे वाद गृहनिर्माण संस्थातील वातावरण बिघडवू शकतात. असे वादविवाद तातडीने मिटवून लवकरात लवकर सलोख्याचे वातावरण प्रस्थापित व्हावे यासाठी महासंघ सतत प्रयत्नशील असतो.
यापलीकडे जाऊन महासंघ सभासदांमध्ये एकजुटीची भावना वाढावी यासाठी सक्रिय प्रयत्न करत असतो. परस्पर सहकार्य आणि खुल्या संवादाला प्रोत्साहन देऊन सभासद त्यांच्या संस्थेच्या भल्यासाठी एकोप्याने काम करू शकतील असे वातावरण तयार करण्याचे महासंघाचे ध्येय आहे.
महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाच्या सहकार्याने विकसित केलेल्या "सहकार संवाद" ऑनलाइन पोर्टलद्वारे महासंघ , सहकारी गृहनिर्माण संस्थासंबंधीच्या तक्रारी निवारण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे, तक्रारदार सभासद पोर्टलवर जाऊन त्यांच्या तक्रारींची नोंदणी करू शकतात. महासंघ ह्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यरत आहेच.
कामामध्ये पारदर्शकता, जागरूकता निर्माण करणे, वादविवाद मध्यस्थीने सोडवणे आणि परस्पर सामंजस्याने एक शांततापूर्ण सहजीवन जगण्यासाठी सर्व सभासदांना उद्युक्त करणे हे महासंघाचे प्रमुख काम आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या सहकार्याने गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या सदस्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यायोगे सहकार समुदाय शक्तिशाली करण्यासाठी महासंघ कटिबद्ध आहे. महासंघ सभासदांना कायदेशीर मार्गदर्शन आणि त्यांच्या गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीचे डीम्ड कन्व्हेयन्स मिळविण्यासाठी नक्कीच मदत करेल . या बाबतीतील महासंघाच्या अथक प्रयत्नांमुळे असंख्य सोसायट्यांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्क मिळवून देण्यात आणि तेथील रहिवाशांमध्ये सुरक्षितता आणि स्थिरतेची भावना निर्माण करण्यामध्ये संघ यशस्वी झाला आहे.
जागरूक आणि सक्षम असलेला एकसंध सहकार समुदाय करण्याच्या वाटचालीत आमचे सहप्रवासी होण्यासाठी आपणही महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे सभासद व्हा.