सहकार संवाद पोर्टलची उद्दिष्टे
महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाने महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सहकार संवाद हे ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना त्यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निबंधकांच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या प्रकरणांशी संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी एक सुलभ आणि पारदर्शी प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
मुख्य वैशिष्ट्ये:
तक्रार नोंदणी: “सहकार संवाद” या पोर्टल वर सहकारी गृहनिर्माण संस्थेचा कोणताही सभासद किंवा भावी सभासद सुलभतेने तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. तक्रारदार त्यांची समस्या आपल्या शब्दात मांडू शकतात (शब्दाची कमाल मर्यादा 200 शब्द). संबंधित दस्तऐवज उपलब्ध असल्यास आणि आवश्यक वाटल्यास अपलोड करू शकतात( कमाल फाईल साईझ १MB पर्यंत) . दस्तऐवज दाखल केल्यास समस्येचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल.
पोर्टलच्या देखभालीसाठी शुल्क: “सहकार संवाद” चे कामकाज पूर्ण कार्यक्षमतेने चालू ठेवण्यासाठी आणि अद्ययावत राखण्यासाठी तक्रारदारांकडून नाममात्र शुल्क घेतले जाईल. हे शुल्क केवळ पोर्टलच्या देखभालीसाठी वापरले जाईल. सभासदांना पोर्टलच्या सेवा सहजपणे कायम उपलब्ध व्हाव्यात असा यामागे विचार आहे.
सहकारी शिक्षणाचे सक्षमीकरण: तक्रार नोंदणी शुल्काद्वारे आलेल्या निधीचा उपयोग गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या सदस्यांना सहकार क्षेत्रासंबंधी शिक्षण देण्यासाठी आणि प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यासाठीही केला जाईल. या कार्यक्रमांचा उद्देश सभासदांमध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960, नियम, उपविधी आणि इतर संबंधित नियमांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा असेल.
तक्रारीचे प्रभावी पुनर्निर्देशन आणि त्यांच्या निरकरणा संदर्भात आढावा: “सहकार संवाद” वर तक्रार दाखल केल्यानंतर, ती आपोआप संबंधित सह/उप/सहकारी निबंधक यांच्याकडे निर्देशित केली जाईल. संबंधित उच्च अधिकारी तक्रार निराकरणाच्या प्रक्रियेवर सक्रियपणे लक्ष ठेवतील, वेळेवर प्रतिसाद दिला जात आहे आणि योग्य कारवाई होत आहे याची खात्री करून घेतील.
पारदर्शक आढावा: तक्रारकर्ते त्यांच्या तक्रारीचं काय झालं हे कधीही पाहू शकतात. त्यामुळे तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता प्राप्त होते आणि उत्तरदायित्वही येते.
जिल्हा फेडरेशनकडून पाठिंबा : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जिल्हा संघांचे “सहकार संवाद” ला सक्रिय सहकार्य आहेच. ते सभासद गृहनिर्माण संस्थांना गरजेनुसार मार्गदर्शन आणि आवश्यक प्रशिक्षण देतील. तक्रारी कमी करुन आणि सहकार भावनेचा विकास करणे हे अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक असेच त्यांचे कार्य असेल.
सहकार भावनेचा प्रसार : सहकार संवाद केवळ तक्रार निवारण मंच म्हणून काम करणार नाही तर सहकार शिक्षणासाठी सर्वसमावेशक संसाधन केंद्र (Resource Hub) म्हणूनही काम करेल. हे सहकार तत्त्वांबद्दल आवश्यक माहिती उपलब्ध करुन देईल. सभासदांची सहकार चळवळीबद्दलची समज अधिक खोल व्हावी हाच ह्या माहितीचा उद्देश असेल.